Monday 11 November 2013

स्त्री अत्याचार समस्येच्या मूळावर घालण्याची गरज


अलका गौरी यांचे प्रतिपादन


प्रचंड उत्साहात युवती संमेलनसोलापूर, प्रतिनिधीसमाजात महिलांवर होणार्‍या अत्याचारावर केवळ टिका न करता महिलांनी या विरोधात सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. ही समस्या केवळ मलमपट्टीने सुटणार नसून त्याच्या मूळावर घाव घालण्याची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या अखिल भारतीय युवा आयामप्रमुख अलका गौरी यांनी केले.
स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीच्या संवर्धिनी आयामाकडून सोमवारी येथील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर आयोजित युवती संमेलनात त्या बोलत होत्या. विवेकानंदांच्या दृष्टीकोनातून महिला सुरक्षितता हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. यावेळी व्यासपीठावर संवर्धिनी आयामाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख डॉ. शोभा शाह, सोलापूर जिल्हा प्रमुख अमृता बदामीकर, जिल्हा सहप्रमुख वीणा नाईक होत्या.अलकागौरी जोशी म्हणाल्या, स्त्री बद्दलची भारतीयांची संकल्पना इतर देशांच्या तुलनेत विस्तृत आहे. भारतीय संस्कृतीत स्त्री हे मनोरंजनाचे किंवा व्यवस्थेचे साधन नसून स्त्रीला आदीशक्ती म्हटले आहे. महिलांवर पूर्वीही अत्याचार होतच होते. परंतु काही दशकांपासून महिला स्वतंत्र होऊ लागल्यामुळे त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी महिलांवरील अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. महिलांची सुरक्षितता ही केवळ महिलांची नसून संपूर्ण समाजाची सुरक्षितता असते, हे समाजाला पटवून देण्याची गरज आहे. स्वामी विवेकानंद ही स्त्री शिक्षणाच्याबाबतीत आग्रही होते. भगिनी निवेदीता भारतात आल्यानंतर स्वामीजींनी त्यांच्याकडे भारतीय मुलींना शिकविण्याची जबाबदारी दिली होती असे त्यांनी सांगितले.
 स्त्रीला भारतात सन्मान मिळत नाही हा केला जाणारा प्रचार निखालस खोटा आहे. सद्य सामाजीक परिस्थिती या आरोपांना बळकटी देणारी होत असली तरी हे चित्र पालटून भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची जबाबदारी युवतींनी घेतली पाहिजे. युवतींनी आत्मविश्‍वासाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे असे संवर्धिनी आयामाच्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख डॉ. शोभा शाह म्हणाल्या, देशातील आध्यात्मिक, वैचारिक, सामाजिक, राजकीय क्षेत्राात संभ्रमाचे वातावरण आहे. अशाप्रसंगी देशाला स्वामी विवेकानदांच्या विचारांची गरज आहे. हाच विचार देशाला जगद्गुरूपदी विराजमान करु शकेल. स्वामीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त केवळ देशातच नव्हे तर जगातही जागरण केले जात आहे. त्यासाठी भारत जागो विश्‍व जगाओ हे ब्रीद निश्‍चित करण्यात आले आहे. प्रा. अनिता अलकुंटे यांनी सूत्रसंचालन तर सोलापूर जिल्हाप्रमुख अमृता बदामीकर यांनी आभारप्रदर्शन केले. प्रारंभी पल्लवी घोगले यांनी शांतिमंत्र म्हटले. तर पल्लवी सोलापुरे यांनी मुक्त गगन हे गीत गायिले.
 या कार्यक्रमास आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ निशिगंधा माळी, तहसीलदार शिल्पा ठोकडे, महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ङ्गिरदोस पटेल, शुभांगी बुवा, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. कुंकुमतिलक लावून युवतींचे स्वागत करण्यात आले. सर्व सहभागी युवतींना स्वामी विवेकानंद व पाच दीपस्तंभ हे पुस्तक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.
लव्ह जिहादाचा वाढता धोका घातक
भारतात महाविद्यालयीन युवतींना ङ्गसवून त्यांना लव्ह जिहादच्या कटाच्या माध्यमातून ङ्गसविण्याचे प्रमाण वाढत आहे. पैसा किंवा इतर वस्तूंचे आमिष दाखवून मुलींना जाळ्यात अडकविण्याचा लव्ह जिहादचा धोका वाढत असून युवतींनी यापासून सावध रहावे असे आवाहन अलकागौरी जोशी यांनी यावेळी युवतीनंा केले.
वंदे मातरम अवतरण दिन
१८७५ च्या कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीला वंदे मातरम हे गीत ऋषी बंकिमचंद्रांच्या लेखनीतून कागदावर अवतरले होते. सोमवारी कार्तिक शुक्ल नवमी असल्याने कार्यक्रमानंतर संपूर्ण वंदे मातरम गाऊन स्मरण करण्यात आले. यावेळी प्रा. अलकुंटे म्हणाल्या, पुस्तके आणि ग्रंथ यांचा वाढदिवस किंवा जन्मदिवस साजरे होत नाहीत. पण भगवद्गीता हा ग्रंथ याला अपवाद आहे. गीत किंवा कवितेचा जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा नाही पण याला अपवाद आहे वंदे मातरम हे गीत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम’ला मंत्राचे स्वरुप प्राप्त झाले होते. जगाच्या इतिहासात इतकी लोकप्रियता अन्य कोणत्याही देशभक्तीपर गीताने घेतली नाही.

Friday 8 November 2013

स्वागताध्यक्ष श्री. ए. जी. पाटील यांचे मनोगत.


आजपासून (शनिवार, दि. ९ नोव्हेंबर) सोलापूर नगरीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ‘विवेकानंदपूरम्’मध्ये विवेकानंद संमेलनाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने स्वागताध्यक्ष श्री. ए. जी. पाटील यांचे मनोगत.

विवेकानंद साहित्य संमेलन
स्वामी विवेकानंद यांचे भारताच्या इतिहासात नेमके स्थान कोणते? असा प्रश्‍न कोणी विचारला तर मी त्याचे एका वाक्यात उत्तर देईन, स्वामी विवेकानंद ही या देशाची प्रेरक शक्ती (मोटिव्हेशनल ङ्गोर्स) आहे. या भारत देशाच्या गेल्या १२५ वर्षांच्या वाटचालीत जेव्हा जेव्हा नैराश्य आणि न्यूनगंडाचा प्रभाव जाणवायला लागला तेव्हा स्वामीजींच्या विचारांनी ते नैराश्य झटकले गेले. न्यूनगंडाची जागा स्वत्वाच्या भावनेने घेतली. देश पारतंत्र्यात होता तेंव्हा लोकांच्या मनावर गुलामीची छाया पसरली होती. ती काळी छाया पुसली जाऊन तिची जागा स्वत्वाच्या आत्मविश्‍वासाने घेतली गेली पाहिजे, असे त्याकाळी म्हटले जात होते. स्वदेश, स्वधर्म यांच्या विषयीची अस्मिता जागी झाली तरच हा भारतीय समाज ब्रिटीशांच्या गुलामीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्याचा मुक्त श्‍वास घेण्यासाठी संघर्षास सिद्ध होईल, असे मत अनेक स्वातंत्र्यसेनानी व्यक्त करीत होते. १८९३ मध्ये स्वामीजींनी अमेरिकेतल्या शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म संमेलनात जो पराक्रम केला, त्या पराक्रमाने भारतीयांची स्वत्वाची भावना प्रज्वलित झाली आणि तिनेच स्वातंत्र्य संग्रामाला चेतना दिली.
स्वातंत्र्य मिळाले पण स्वामीजींचा विचार विस्मरणात गेला. भारतीय संस्कृती अहिंसेची पूजक आहे. पण शांततेची पूजा करताना स्वसंरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ते दुर्लक्ष देशासाठी जीवघेणे ठरेल. नोव्हेंबर १९६२ च्या युद्धात भारत चीनकडून पराभूत झाला. १९६३ हे वर्ष भारतीयांसाठी खिन्नतेचे गेले. देशभरात पराभूत मनोवृत्तीची छाया पसरली. ते वर्ष स्वामीजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. कन्याकुमारी येथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरले. त्यासाठी प्रत्येकाकडून एक (आणि एकच) रूपया निधी जमा करणे आणि त्यांच्यापर्यंत स्वामीजींचा विचार पोहचविणे असा देशव्यापी कार्यक्रम पार पडला. या विचारांमुळे देशवासीयांच्या मनावरचे पराभूत वृत्तीचे मळभ दूर झाले. देशातला तरूण वर्ग आत्मविश्‍वासाने उभा राहिला तर ही भारतभूमी सार्‍या विश्‍वाला मार्गदर्शन करणारी महाशक्ती बनू शकते हा स्वामीजींचा विचार देशात विजिगिषु वृत्तीचे वादळ निर्माण करून गेला. देशाच्या वाटचालीत नेहमीच ऊन सावलीचा खेळ सुरू असतो. अनेक प्रकारचे नवे प्रवाह निर्माण होतात. त्या प्रवाहांनी समाजजीवन दूषित होते. त्याला वरचेवर शुद्ध करावे लागते. स्वामीजींचे कालत्रयी विचार नेहमीच अशा शुद्धीकरणाचा आधार ठरले आहेत.
आता आपला देश एका विचित्र अवस्थेतून वाटचाल करीत आहे. स्वामीजी त्यांच्या हयातीत देशातल्या उदंड दारिद्य्राबद्दल सतत अस्वस्थ होत असत. ते दारिद्य्र अजूनही कायम आहे. पण समाजातला एक वर्ग जीवनावश्यक गरजांनाही मोताद असताना याच समाजात श्रीमंतीचे अजीर्ण झालेला एक वर्गही तयार झालेला दिसत आहे. समृद्धीचा आणि श्रीमंतीचा अर्थ न समजलेला हा वर्ग भोगवादाच्या आहारी गेला असल्यामुळे समाजात काही विकृती दिसत आहेत. संस्काराविना संपत्ती मिळालेल्या या वर्गाला संस्कृती शिकविली नाही तर मोठा अनर्थ ओढवणार आहे. भोगवादाचा अतिरेक झाल्यामुळे सामाजिक अधःपतन झालेल्या कथित प्रगत देशांचे सामाजीक प्रश्‍न गहन झाले आहेत. आपल्यालाही या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी स्वामीजींचा विचार आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक होतेच, पण त्यांनी पाश्‍चात्य संस्कृतीही जवळून पाहिली होती. केवळ पाहिलीच होती असे नाही आज आपला देश जसा समृद्धीतून सांस्कृतिक सर्वनाशाकडे वाटचाल करीत आहे. तशी अमेरिकेची वाटचाल सुरू असतानाच्या काळात स्वामीजी अमेरिकेत होते. त्यांनी ही प्रक्रीया याची देही याची डोळा पाहिली होती. भोगवाद आणि परंापरांचे प्रेम यामुळे संभ्रमात पडलेल्या आजच्या भारतीय तरूणानंा स्वामीजींच्या विचारांची गरज आहे. म्हणून सोलापूरात स्वामीजींच्या सार्ध शतीच्या औचित्यावर विवेकानंद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ए. जी. पाटील, स्वागताध्यक्ष

Sunday 3 November 2013

विवेकानंद संमेलनासाठी राज्यभरातून येणार सातशेहून अधिक प्रतिनिधी



सोलापूर | स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षानिमित्त (सार्ध शती) ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सोलापुरात होणार्‍या विवेकानंद साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत ६८७ प्रतिनिधींची नोंदणी झाली. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, नागपूर, हिंगोलीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नोंदणी प्रमुख प्रा. श्रीनिवास भंडारे यांनी सांगितले.
शहरातील संगमेश्‍वर महाविद्यालय, वालचंद शिक्षण संस्था, एसईस पॉलिटेक्निक, दयानंद शिक्षणसंस्था, बृहन्मठ होटगी संस्थेतील एसव्हीसीएस महाविद्यालय, शिवाजी रात्र महाविद्यालय, बुर्ला महिला महाविद्यालय, अक्कलकोट येथील खेडगी महाविद्यालय, इंडियन मॉडेल बीएड कॉलेज यासह अनेक शाळांच्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे भंडारे यांनी सांगितले. साहित्य संमेलन सर्वांसाठी खुला असून या काळात वीस हजार विवेकानंदप्रेमी येतील, असे नियोजन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात येत असल्याचे संघटक धनंजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
अखिल भारतीय विवेकानंद साहित्य संमेलनात सहभागाचे प्रमाणपत्र, दोन्ही दिवसाच्या भोजन, अल्पोपहार, निवास आदी सुविधा फक्त प्रतिनिधींसाठी असणार आहे. त्यासाठी ३००
रुपये शुल्क भरून विवेकानंद केंद्र, १६५, रेल्वे लाईन्स येथील कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क १५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९०२८५७४६२७.
हिंदी विकास मंचचा पुढाकार
संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र कोहली हे हिंदी भाषेतील ख्यातनाम साहित्यिक आहेत. त्यामुळे हिंदी विकास मंचाकडून अधिकाधिक हिंदीचे शिक्षक आणि प्राध्यापक संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार असल्याचे मंचाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी सांगितले. विवेकानंद केंद्रात हिंदी विकास मंचाची यासाठी झालेल्या बैठकीत सचिव प्रा. भगवान आदटराव, प्रा. गंगाधर बिराजदार, प्रा. शिवराज पाटील, प्रा. सिद्धाराम पाटील आदीसह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.