Friday, 8 November 2013

स्वागताध्यक्ष श्री. ए. जी. पाटील यांचे मनोगत.


आजपासून (शनिवार, दि. ९ नोव्हेंबर) सोलापूर नगरीत हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर ‘विवेकानंदपूरम्’मध्ये विवेकानंद संमेलनाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने स्वागताध्यक्ष श्री. ए. जी. पाटील यांचे मनोगत.

विवेकानंद साहित्य संमेलन
स्वामी विवेकानंद यांचे भारताच्या इतिहासात नेमके स्थान कोणते? असा प्रश्‍न कोणी विचारला तर मी त्याचे एका वाक्यात उत्तर देईन, स्वामी विवेकानंद ही या देशाची प्रेरक शक्ती (मोटिव्हेशनल ङ्गोर्स) आहे. या भारत देशाच्या गेल्या १२५ वर्षांच्या वाटचालीत जेव्हा जेव्हा नैराश्य आणि न्यूनगंडाचा प्रभाव जाणवायला लागला तेव्हा स्वामीजींच्या विचारांनी ते नैराश्य झटकले गेले. न्यूनगंडाची जागा स्वत्वाच्या भावनेने घेतली. देश पारतंत्र्यात होता तेंव्हा लोकांच्या मनावर गुलामीची छाया पसरली होती. ती काळी छाया पुसली जाऊन तिची जागा स्वत्वाच्या आत्मविश्‍वासाने घेतली गेली पाहिजे, असे त्याकाळी म्हटले जात होते. स्वदेश, स्वधर्म यांच्या विषयीची अस्मिता जागी झाली तरच हा भारतीय समाज ब्रिटीशांच्या गुलामीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्याचा मुक्त श्‍वास घेण्यासाठी संघर्षास सिद्ध होईल, असे मत अनेक स्वातंत्र्यसेनानी व्यक्त करीत होते. १८९३ मध्ये स्वामीजींनी अमेरिकेतल्या शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म संमेलनात जो पराक्रम केला, त्या पराक्रमाने भारतीयांची स्वत्वाची भावना प्रज्वलित झाली आणि तिनेच स्वातंत्र्य संग्रामाला चेतना दिली.
स्वातंत्र्य मिळाले पण स्वामीजींचा विचार विस्मरणात गेला. भारतीय संस्कृती अहिंसेची पूजक आहे. पण शांततेची पूजा करताना स्वसंरक्षणाकडे दुर्लक्ष झाले. ते दुर्लक्ष देशासाठी जीवघेणे ठरेल. नोव्हेंबर १९६२ च्या युद्धात भारत चीनकडून पराभूत झाला. १९६३ हे वर्ष भारतीयांसाठी खिन्नतेचे गेले. देशभरात पराभूत मनोवृत्तीची छाया पसरली. ते वर्ष स्वामीजींच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. कन्याकुमारी येथे त्यांचे स्मारक उभे करण्याचे ठरले. त्यासाठी प्रत्येकाकडून एक (आणि एकच) रूपया निधी जमा करणे आणि त्यांच्यापर्यंत स्वामीजींचा विचार पोहचविणे असा देशव्यापी कार्यक्रम पार पडला. या विचारांमुळे देशवासीयांच्या मनावरचे पराभूत वृत्तीचे मळभ दूर झाले. देशातला तरूण वर्ग आत्मविश्‍वासाने उभा राहिला तर ही भारतभूमी सार्‍या विश्‍वाला मार्गदर्शन करणारी महाशक्ती बनू शकते हा स्वामीजींचा विचार देशात विजिगिषु वृत्तीचे वादळ निर्माण करून गेला. देशाच्या वाटचालीत नेहमीच ऊन सावलीचा खेळ सुरू असतो. अनेक प्रकारचे नवे प्रवाह निर्माण होतात. त्या प्रवाहांनी समाजजीवन दूषित होते. त्याला वरचेवर शुद्ध करावे लागते. स्वामीजींचे कालत्रयी विचार नेहमीच अशा शुद्धीकरणाचा आधार ठरले आहेत.
आता आपला देश एका विचित्र अवस्थेतून वाटचाल करीत आहे. स्वामीजी त्यांच्या हयातीत देशातल्या उदंड दारिद्य्राबद्दल सतत अस्वस्थ होत असत. ते दारिद्य्र अजूनही कायम आहे. पण समाजातला एक वर्ग जीवनावश्यक गरजांनाही मोताद असताना याच समाजात श्रीमंतीचे अजीर्ण झालेला एक वर्गही तयार झालेला दिसत आहे. समृद्धीचा आणि श्रीमंतीचा अर्थ न समजलेला हा वर्ग भोगवादाच्या आहारी गेला असल्यामुळे समाजात काही विकृती दिसत आहेत. संस्काराविना संपत्ती मिळालेल्या या वर्गाला संस्कृती शिकविली नाही तर मोठा अनर्थ ओढवणार आहे. भोगवादाचा अतिरेक झाल्यामुळे सामाजिक अधःपतन झालेल्या कथित प्रगत देशांचे सामाजीक प्रश्‍न गहन झाले आहेत. आपल्यालाही या संकटाला तोंड द्यावे लागत आहे, अशा वेळी स्वामीजींचा विचार आपल्याला मार्गदर्शक ठरणार आहे. स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक होतेच, पण त्यांनी पाश्‍चात्य संस्कृतीही जवळून पाहिली होती. केवळ पाहिलीच होती असे नाही आज आपला देश जसा समृद्धीतून सांस्कृतिक सर्वनाशाकडे वाटचाल करीत आहे. तशी अमेरिकेची वाटचाल सुरू असतानाच्या काळात स्वामीजी अमेरिकेत होते. त्यांनी ही प्रक्रीया याची देही याची डोळा पाहिली होती. भोगवाद आणि परंापरांचे प्रेम यामुळे संभ्रमात पडलेल्या आजच्या भारतीय तरूणानंा स्वामीजींच्या विचारांची गरज आहे. म्हणून सोलापूरात स्वामीजींच्या सार्ध शतीच्या औचित्यावर विवेकानंद साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

ए. जी. पाटील, स्वागताध्यक्ष

No comments:

Post a Comment