Sunday, 3 November 2013

विवेकानंद संमेलनासाठी राज्यभरातून येणार सातशेहून अधिक प्रतिनिधी



सोलापूर | स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षानिमित्त (सार्ध शती) ९ आणि १० नोव्हेंबर रोजी सोलापुरात होणार्‍या विवेकानंद साहित्य संमेलनासाठी आतापर्यंत ६८७ प्रतिनिधींची नोंदणी झाली. मुंबई, पुणे, सातारा, सांगली, नागपूर, हिंगोलीसह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नोंदणी प्रमुख प्रा. श्रीनिवास भंडारे यांनी सांगितले.
शहरातील संगमेश्‍वर महाविद्यालय, वालचंद शिक्षण संस्था, एसईस पॉलिटेक्निक, दयानंद शिक्षणसंस्था, बृहन्मठ होटगी संस्थेतील एसव्हीसीएस महाविद्यालय, शिवाजी रात्र महाविद्यालय, बुर्ला महिला महाविद्यालय, अक्कलकोट येथील खेडगी महाविद्यालय, इंडियन मॉडेल बीएड कॉलेज यासह अनेक शाळांच्या शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे भंडारे यांनी सांगितले. साहित्य संमेलन सर्वांसाठी खुला असून या काळात वीस हजार विवेकानंदप्रेमी येतील, असे नियोजन हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर करण्यात येत असल्याचे संघटक धनंजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
अखिल भारतीय विवेकानंद साहित्य संमेलनात सहभागाचे प्रमाणपत्र, दोन्ही दिवसाच्या भोजन, अल्पोपहार, निवास आदी सुविधा फक्त प्रतिनिधींसाठी असणार आहे. त्यासाठी ३००
रुपये शुल्क भरून विवेकानंद केंद्र, १६५, रेल्वे लाईन्स येथील कार्यालयात नोंदणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी शुल्क १५० रुपये आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ९०२८५७४६२७.
हिंदी विकास मंचचा पुढाकार
संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र कोहली हे हिंदी भाषेतील ख्यातनाम साहित्यिक आहेत. त्यामुळे हिंदी विकास मंचाकडून अधिकाधिक हिंदीचे शिक्षक आणि प्राध्यापक संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होणार असल्याचे मंचाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी सांगितले. विवेकानंद केंद्रात हिंदी विकास मंचाची यासाठी झालेल्या बैठकीत सचिव प्रा. भगवान आदटराव, प्रा. गंगाधर बिराजदार, प्रा. शिवराज पाटील, प्रा. सिद्धाराम पाटील आदीसह अनेक प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment