Sunday, 27 October 2013

विवेकानंद साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा विवेक घळसासींच्या हस्ते शुभारंभ

 सोलापूर | येथे ९ आणि १० नोव्हेंबर रोजी होणार्‍या विवेकानंद साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे भूमिपूजन रविवारी सकाळी निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त सार्ध शती समारोह समितीतर्फे हे संमेलन होत आहे. भूमिपूजनप्रसंगी सार्ध शतीचे अखिल भारतीय संयोजक किशोर टोकेकर, पश्‍चिम क्षेत्र सहसंयोजक बसवराज देशमुख, समितीचे जिल्हा अध्यक्ष धर्मराज काडादी, स्वागताध्यक्ष ए. जी. पाटील, कार्याध्यक्ष डॉ. गिरीश कुमठेकर, स्वागतसचिव प्रशांत बडवे, पेंटप्पा गड्डम, दिलीप पेठे, केंद्राचे संचालक दीपक पाटील, हरिभाऊ गोडबोले, राजन रिसबुड, प्राचार्या माया स्वामी, समर्थ बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यीकांना विवेकानंदांचे विचार साहित्यीक अंगाने सर्वसामान्यांपर्यंत समर्थपणे पोहोचवता यावेत, यासाठी या संमेलनाचे आयोजन असल्याचे श्री. घळसासी म्हणाले. आता संमेलन होईपर्यंत व्यक्तीगत आवश्यकता बाजूला ठेवून अधिकाधिक लोकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले. नवशिक्षित बहुजन समाजातील युवकांमध्ये आणि विशेषत: ग्रामीण भागात विवेकानंदांच्या विचारांविषयी पराकोटीचे आकर्षण असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले.
जीवनव्रती कार्यकर्ते श्री. किशोरजी यांनी सार्ध शतीनिमित्त जगभर सुरू असलेल्या कार्यक्रमांची माहिती दिली. विवेकानंदांच्या स्वप्नातील भारत उभा रहावा, या हेतूने देशभरातील चार लाख गावांपर्यंत स्वामीजींचे विचार पोहोचण्यात आले. शोभायात्रांमध्ये ५३ लाख लोकांनी सहभाग नोंदवला. सामुदायिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात दोन कोटींहून अधिक विद्यार्थी आणि भारत जागो दौडमध्ये ३२ लाखांहून अधिक महाविद्यालयीन युवकांचा सहभाग राहिल्याचे ते म्हणााले.
स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वाचा व विचारांचा देशात प्रभाव आहे. १५० व्या जयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमांमधून हे स्पष्ट झाल्याचे धर्मराज काडादी यांनी म्हटले. तसेच समितीतकडून येत्या काळात राबवल्या जाणार्‍या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास दुर्गाप्रसाद मिणियार, सुहास देशपांडे, वल्लभदास गोयदानी, महेश आंदेली, प्रा. अनिता अलकुंटे, प्रा. शिवराज पाटील, कवी देवेंद्र औटी, नंदकुमार चितापुरे, मदगोंडा पुजारी, आनंद भंडारे आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संमेलनाचे समन्वयक सिद्धाराम पाटील यांनी केले.
**********
फोटो ओळ :

मंडप उभारणीच्या शुभारंभप्रसंगी विवेक घळसासी, धर्मराज काडादी, ए. जी. पाटील, प्रशांत बडवे, दीपक पाटील, राजन रिसबूड, माया स्वामी, दिलीप अत्रे दिलीप पेठे आदी.




No comments:

Post a Comment